महाराष्ट्र बँकेत दरोड्याचा प्रयत्न; सोन्यासह रोख रक्कम लंपास



• गॅस कटरने खिडकी तोडून चोरटे शिरले बँकेत
• सुरक्षेकरीता लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोड

चंद्रपूर : सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र बँकेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करीत मागील बाजूस असलेल्या खिडकीला गॅस कटरने तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. आणि सोन्यासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना वरोरा तालुक्यातील टेंमूर्डा महाराष्ट्र बँकेत आज शनिवारी (२० मार्च) सकाळी उघडकीस आली आहे.

वरोरा तालुक्यातील टेमूर्डा येथे महाराष्ट्र बँकेची शाखा असून परिसरातील गावातील नागरिक या बँकेचे ग्राहक आहे. दैनंदिन व्यवहारात लागणारी रक्कम काढणे, भरणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बँक शाखेत सोना पैसा ठेवत असतात. काल शुक्रवारी बँकेत दिवसभर दैनंदिन व्यवहार झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास काही चोरट्यांनी बँकेत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम सुरक्षेकरिता बँकेत व सभोवती लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर बँकेच्या मागील बाजूस असलेली खिडकी गॅस कटरच्या सहाय्याने तोडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला. बँकेमध्ये असलेले सोना आणि काही रक्कम त्यांनी लंपास केली.

प्राथमिक माहितीमध्ये सहा लाख रुपये कॅश आणि सोना चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड होत आहे. नेहमीप्रमाणे आज शनिवारी बँक उघडण्यात आली असता चोरीची घटना समोर आली. सदर घटनेची माहिती लगेच पोलिसांना देण्यात आली. डाॅग स्कॉटसह पोलिसांनी घटनास्थळी येऊन बँकेत घडलेल्या चोरीच्या घटनेची माहिती घेतली व पाहणी केली. बँक पासून जवळच असलेल्या शेतशिवारात गॅस कटर साठी लागणारा सिलेंडर आढळून आला आहे. सोना आणि सुमारे सहा लाख रक्कम असे एकूण १५ लाखाची चोरी झाल्याची माहिती पुढे आली आहे. बँकेमध्ये दरोडा करण्याच्या उद्देशाने ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वृत्त लिहीपर्यंत आरोपींचा शोध लागलेला नव्हता. पोलिस उपविभागीय अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सूर्यवंशी यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. डाॅग स्कॉटच्या सहायाने चोरट्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments