चंद्रपूर : बल्लारपूरचे चेन्नई - न्यू दिल्ली ग्रँड ट्रॅक रेल्वे मार्गावर विसापूर जवळील जुन्या पावर हाउस जवळ गुरुवारी मध्यरात्री रेल्वे रूळावर अस्वलाचा मृतदेह आढळून आला. रेल्वेच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटना बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील विसापूर नियत क्षेत्रांतर्गत विसापूर ते बल्लारशाह रेल्वे रूट वरील पोळ क्रमांक ८८६/२७ ते ८८६ / २ ९ च्या दरम्यान घडली. घटनेची माहिती एहसान उल्लाखान यांनी दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, क्षेत्र सहायक एस.आर. भोवरे, नियतवनरक्षक डी.बी. टेकाम, वनरक्षक ए.जी. तिजारे यांनी मौकास्थळी जाऊन पाहणी केली.
बल्लारशाह डिप्टी स्टेशन प्रबंधक यांना माहिती देऊन पशुवैद्यकीय अधिकारी यांना माहितीस्तव कळविण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मृत अस्वलाच्या शवाचे पाहणी करून रोपवाटिका विसापूर येथे शव विच्छेदन करून शवास दहन करण्यात आले. सदर प्रकरणात आकस्मित मृत्यूबाबत नियतक्षेत्र विसापूर अंतर्गत प्राथमिक गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करीत आहे.
0 Comments